- शिवसेना उमेदवार सौ. सुलभाताई उबाळे यांचा हाच संकल्प..
- पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ०७ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३, निगडी गावठाण, से. क्र. २२ ओटा स्कीम, यमुनानगर, साईनाथनगर या भागातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासह ‘ब’) शुभांगी संजय बोऱ्हाडे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग–महिला आणि ‘ड’) तानाजी हिरामण शिंदे (सर्वसाधारण) हे उमेदवार देखील मैदानात आहेत. या तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
प्रभागातील मतदारांना आवाहन करताना सुलभाताई म्हणाल्या, ”महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग उर्फ ‘आप्पा’ बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहिताच्या अनेक योजना शहरात राबविल्या जात आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेने तर हजारो महिलांना आर्थिक आधार आणि आत्मविश्वास दिला आहे. त्याच धर्तीवर महापालिकेतील अनेक कल्याणकारी योजना प्रभागातील पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनापासून काम करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
महापालिका आणि प्रभागातील नागरिकांमधला दुवा अधिक मजबूत व्हावा, तक्रारींवर जलद कार्यवाही व्हावी, तसेच महिलांसाठी स्वयंरोजगार, बचतगट, आरोग्य तपासणी शिबिरे आणि मार्गदर्शन उपक्रम नियमित राबवण्याचा आमचा मानस आहे. पाणी, रस्ते, सांडपाणी, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, उद्याने आणि क्रीडा सुविधा या सर्व बाबींवर ठोस नियोजन करून कामे मार्गी लावू. आपल्या विश्वासाच्या बळावर आम्ही प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून महापालिका निवडणुकीस सामोरे जात आहोत.
तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे. विकास, पारदर्शकता आणि जनहितासाठी कटिबद्ध राहून प्रत्येक नागरिकाचा आवाज महापालिकेत ठामपणे मांडू, हीच आमची शपथ आहे, असा विश्वास शिवसेनेच्या सुलभाताई उबाळे यांनी व्यक्त केला.












