न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांचा प्रचार प्रभागात जोरदारपणे सुरू आहे. त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रचारफेरी दरम्यान महिलावर्ग संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनल मधील उमेदवारांना औक्षण करून शुभेच्छा देत आहेत. आता या पॅनलच्या विजयासाठी वासुदेवही सरसावले आहेत.
आला रे आला वासुदेव आला, ठेवू ध्यानात सारे चला, संदीपभाऊच्या कार्याला हे पटलंय मनाला मतदान करू घड्याळाला हे पटलंय मनाला मतदान संदीप भाऊला..
संदीप वाघेरे यांनी बीड-बार्शी मधील आपदग्रस्तांना मदत केली होती. अन्नधान्य वाटप केले होते. त्याची कृतज्ञता बाळगत हे वासुदेव बीड बार्शीहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. निवडणूक प्रचारातील हे वासुदेव राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन करत असून हा कुतूहलाचा विषय झाला आहे.












