न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- मोशी व डुडुळगाव सीमेवरील ३३ एकर वनक्षेत्रात मोठ्या संख्येने पक्षी आहेत. उन्हाळ्यात तेथील पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी परिसरातील नागेश्वर निसर्ग मित्र व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे पक्ष्यांची तहान भागत आहे.
या वन परिसरात तब्बल २५ हजार झाडे आहेत. तेथे विविध पक्ष्यांसह मोरही आहेत. तीव्र उन्हामुळे येथील पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील नागेश्वर निसर्ग मित्र या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन पाण्याचा २ टाक्या बसविल्या आहेत. तसेच सुमारे १ किलोमीटर अंतर जलवाहिनी टाकली आहे. जेसीबीने खोदकाम करीत छोटे पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी व पक्षी यांची पाण्याची सोय झाली आहे. या ग्रुपकडून आठवड्यात दोन वेळा पक्ष्यांना खाद्यही दिले जाते.
या उपक्रमांची महापौर राहुल जाधव यांनी नुकतीच पाहणी केली. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते विलास आल्हाट, सागर वैरागर, योगेश बोराटे, नवनाथ सस्ते, अजित आल्हाट, राजू आल्हाट, प्रमोद आल्हाट, दिनेश हिंगणे आदींनी सहभाग घेतला आहे.















