- शहरवासियांच्या तोंडच पाणी पळविणाऱ्या ठेकेदारासह अधिकारी मोकाट?..
- आता अर्धवट कामाला कोण हात घालणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 06 मार्च 2026) :- पिंपरी-चिंचवड शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. तब्बल सहा वर्षे उलटूनही जलवाहिनीचे काम अपूर्ण आहे. याला कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने फक्त त्याचेकडील काम काढून घेण्याची किरकोळ कारवाई केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर अनिश्चिततेचे सावट अधिक गडद झाले असून ही शहरवासीयांची शुद्ध फसवणुकच म्हणावी लागेल.
लवकरच दिवसाआड पाणीपुरवठा बंद होऊन नियमित पाणी पुरवठा होईल या आश्वासनावर राहणाऱ्या नागरिकांना तब्बल सहा वर्ष ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांनी मुर्खात काढलं?. इतक्या मोठ्या प्रकल्पाच काम वेळेत न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? यामागे काही काळेबेरे आहेत का? याची चौकशी कोण करणार?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान ठेकेदाराला कामातून काढण्यात आले असले तरी, उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी कोणता ठेकेदार पुढे येणार? ही योजना प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार? याबाबत महापालिकेकडे स्पष्ट उत्तर नाही. या प्रकल्पात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. हायड्रॉलिक टेस्टिंगच्या नावाखाली खेड आणि मावळ तालुक्यात ठेकेदाराने मोठमोठे खड्डे खणून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले असून हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न तेथील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, या पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून डीआरए कन्सल्टंट या एजन्सीची नियुक्ती ३ मार्च २०१८ रोजी करण्यात आली होती. मूळ ३६ महिन्यांची मुदत संपल्यानंतरही या एजन्सीला पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. मूळ ७ कोटी २८ लाख ३७ हजार रुपयांच्या करारावर नियुक्त झालेल्या या सल्लागार संस्थेवर अतिरिक्त २ कोटी ३१ लाख ५७ हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. आता प्रकल्पच अधांतरी लटकल्यामुळे सल्लागारावर होणारी उधळपट्टी तरी थांबणार का? असा सवाल शहरातील नागरिक व्यवस्थेला करू पाहत आहेत.
याप्रकरणी ठेकेदारासह सबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाईची अपेक्षा असताना त्यांना अप्रत्यक्षरित्या पाठीशी घालण्याच षडयंत्र कोणाच्या सांगण्यावरून रचण्यात आलं? यामागे काही काळेबेरे आहेत का? याची चौकशी कोण करणार? हे एकदा प्रशासनाने जाहीर करावं, अशी कुजबुज सर्वत्र सुरु आहे.
या योजने अंतर्गत खेड येथील वाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील बँक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १८.३० किलोमीटर अंतरावर १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम १५ डिसेंबर २०२० रोजी १६२ कोटी रुपयांत देण्यात आले होते. हे काम १४ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नाही. उलट ठेकेदाराने मुदतवाढीसोबतच दरवाढीची मागणी करत प्रशासनावर दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने दरवाढ नाकारल्यानंतर कामच ठप्प झाले आणि तब्बल ३० टक्के काम अद्याप अपूर्ण राहिले आहे.
या जलवाहिनीचे काम ठेकेदाराला मुदतीत पूर्ण करता आले नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले. उर्वरित कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून नवीन ठेकेदार नियुक्त केला जाईल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, मनपा…भामा आसखेड प्रकल्पाचे काम तीस टक्के बाकी आहे. नविन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रीया सुरू आहे. सहा महिन्यांत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड मनपा…












