- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत महत्त्वाची माहिती…
- कृष्णा नदीवर ‘कायमस्वरूपी बंधारा’ कधी बांधणार? आमदार अमित गोरखे यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न; जलसंपदा मंत्र्यांनी दिली ‘बॅरेज’ उभारण्याची ग्वाही…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१७ मार्च २०२६):- सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर, तांबवे आणि परिसरातील १०-१२ गावांतील शेतकऱ्यांचा अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला सिंचनाचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे लावून धरला. आमदार गोरखे यांच्या प्रश्नाची दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या भागात कृष्णा नदीवर कायमस्वरूपी ‘बॅरेज’ उभारण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली.
आमदार अमित गोरखे यांची भूमिका..
आमदार अमित गोरखे यांनी आपल्या प्रश्नातून मसूर परिसरातील शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले की, कृष्णा नदीकाठी असूनही उन्हाळ्यात मसूर आणि तांबवे परिसरातील शेतकऱ्यांचा कंठ कोरडा राहतो. दरवर्षी उन्हाळ्यात नदीत पाणी अडवण्यासाठी शासन मातीचे कच्चे बंधारे बांधते, त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च होतो, जो पावसाळ्याच्या पहिल्याच पुरात वाहून जातो. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकरी ‘कायमस्वरूपी बंधारा’ बांधण्याची मागणी करत आहेत, मात्र हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नव्हता.
सरकारची सकारात्मक भूमिका व मंत्र्यांचे उत्तर..
आमदार गोरखे यांच्या या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले की, शासन या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक आहे. जुन्या बंधाऱ्याची केवळ दुरुस्ती न करता, कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून त्याचे रूपांतर आता ‘बॅरेज’ मध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू झाली आहे. या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही देखील जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात दिली.
भाजपा- महायुती सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मसूर-तांबवे परिसरातील शेतकऱ्यांची ही मागणी रास्त आहे. शेतकरी बांधवांचे दरवर्षी पावसाळ्यात पिक वाहून जाते, तर उन्ह्याळात पाण्याअभावी नुकसान होते. दरवर्षी होणारा आर्थिक अपव्यय थांबवून तिथे शाश्वत सिंचन व्यवस्था व्हावी, यासाठी सभागृहाचे लक्ष वेधले, अशी प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली.












