न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. २० मार्च २०२६) :- रावेत परिसरात डंपर चालकामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास पवना ब्रिज ते समीर लॉन्स दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला. फिर्यादी तेजस सोनवणे यांचा भाऊ सनी सोनवणे हा अॅक्टीवा दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली.
आरोपी चालकाने विनापरवाना तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालविल्याचे समोर आले आहे. या अपघातात सनी सोनवणे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.








