न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २५ मार्च २०२६) :- काळेवाडी परिसरात बनावट ब्रँडेड चप्पल व शूज विक्री प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख ३० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२७ वाजण्याच्या सुमारास एका बेकरी शेजारी असलेल्या ‘विकी फुट वेअर’ दुकानात ही कारवाई करण्यात आली.
आरोपी विकास उर्फ विकी विनोदकुमार रामनानी (वय ३०, रा. विजयनगर, काळेवाडी) हा पुमा कंपनीचे बनावट लोगो लावलेले फ्लिप फ्लॉप, शूज व चप्पल विक्रीसाठी ठेवून ग्राहकांची व कंपनीची फसवणूक करत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी नीरजकुमार नरेंद्रसिंग दहिया (वय ३८, रा. गाझीयाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीकडून बनावट ब्रँडेड वस्तूंचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करत आहेत.








