न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- महापालिका शाळांमधील जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवितात त्यांना महापालिकेतर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते. यंदा पालिकेच्या शाळेतील तीन विद्यार्थी या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या १० च्या परीक्षेचा निकाल ६६ टक्के इतका लागला. यंदा निकाल १९ टक्क्यांनी घटला आहे. शहरात महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या अठरा शाळा आहेत. शाळांमधील जे विद्यार्थी
दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्ता गुण मिळवितात त्यांना एक लाख रुपयांचे बक्षिस मिळते. ८५ ते ८९ टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार तर ८० ते ८४ टक्के गुण मिळविणाच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येते.
यंदा दहावीच्या परीक्षेस २२१२ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १४६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी फक्त तीनच मुलांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये पिंपळे सौदागर येथील महापालिका शाळेतील निवृत्ती साखरे यास ९३.८० टक्के, प्रथमेश जाधव यांस ९३.२० तर थेरगाव महापालिकेच्या शाळेतील गिरीराज उदय यांस ९३. ४० टक्के गुण मिळाले आहेत.














