- रिक्षा चालकांच्या संघर्षाला यश…
- चाकण येथे जनजागृती मेळावा;रिक्षा चालकांना नोंदणीचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- डॉ. बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांसाठी स्थापन झालेले कल्याणकारी मंडळ हे गेल्या २२ वर्षांच्या संघर्षाचे फळ असल्याचे सांगत यामागील लढ्याची आठवण करून दिली. चाकण येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत (खेड-चाकण विभाग) यांच्या वतीने आयोजित जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात ‘कल्याणकारी मंडळ स्थापना’ आणि ‘मुक्त रिक्षा परवाना बंद’ निर्णयाबद्दल जल्लोष करण्यात आला. डॉ. कांबळे म्हणाले, “महामंडळासाठी आम्ही अनेक आंदोलने, मोर्चे काढले, लाठ्याही खाल्या. हा विजय रिक्षा चालकांच्या एकजुटीचा आहे. आता सर्व चालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने नोंदणी करावी.”
प्रास्ताविकात सुनील जाधव यांनी चाकण-खेड परिसरातील वाढत्या रिक्षा संख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधले. अधिकृत रिक्षा स्टँड नसल्याने अडचणी वाढत असून शासनाने तातडीने स्टँड मंजूर करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच शुभम तांदळे यांनी चालकांना फॉर्म भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मेळाव्यात संतोष नाना गुंड, कैलास नाना वलांडे, विशाल ससाने, भाऊसाहेब शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विशाल ससाने यांची शहर युवक अध्यक्षपदी, तर भाऊसाहेब शेलार यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.










