- अशुद्ध पाणीपुरवठ्यावर संताप; शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याचे निर्देश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- श्रीरंग बारणे यांनी शहरातील विकास कामांपेक्षा पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध समस्यांवर कठोर भूमिका मांडली.
रावेत व निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाणारे पाणी अत्यंत अशुद्ध असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याचा पर्याय तपासण्यास सांगितले. शहरात सांडपाणी मिसळल्याने नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच ड्रेनेज लाईनजवळून जाणाऱ्या पाणी पाइपलाईन बदलणे, टँकर बंद करणे आणि पुरेशा दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. बांधकाम परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याचीही मागणी त्यांनी केली.
आरोग्य सेवा, स्वच्छता, मोकाट श्वान नियंत्रण आणि उद्यानांची देखभाल यावरही विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.










