न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून १९८४ नंतर संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याची कार्यवाही केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत ४४० लाभार्थ्यांपैकी ३५८ लाभार्थ्यांना १२. ५ टक्के जमीन परतावा दिलेला आहे.
उर्वरित ८२ लाभार्थ्यांनी पुढील महिनाभराच्या आत १२.५ टक्के जमीन परतावा घेण्यासाठी प्राधिकरण कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन प्राधिकरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्राधिकरणात १९७२ पासून शेतक – यांच्या जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात शेतक-यांना १२.५ टक्के जमीन परतावा देण्याबाबत दोन वेगवेगळे शासन निर्णय झाले. त्यानुसार १९८४ नंतर संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के परतावा देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्याचा आतापर्यंत ३५८ जणांना फायदा मिळाला आहे. उर्वरित ८२ लाभार्थ्यांना अद्याप वाटपाचे काम शिल्लक आहे.











