न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- कामगार नेते इरफानभाई सय्यद युवा मंचच्या माध्यमातून महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने, कामगार नेते, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष इरफान सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, मंगळवार (दि. ११) रोजी शहरातील निगडीतील सेक्टर २२, मजदूर नाका, कृष्णानगर भाजी मंडई चौक या परिसरात उद्योगनगरीतील कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या परिवारांसाठी आयकॉन हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी शिरूर लोकसभा मतदार संघाचे मा. खासदार शिवाजीदादा आढ़ळराव पाटिल, शिवसेना पुणे ज़िल्हा संघटीका, सौ. सुलभाताई ऊबाळे, शिवसेना रूपीनगर तळवडे, प्रभाग क्र. १२ च्या सौ. आशाताई भालेकर, मा. नगरसेवक धनंजय आल्हाट, युवासेना अधिकारी सचिन सानप, शिवसेना संघटक रावसाहेब थोरात, शाखा प्रमुख अनिल सोमवशी, जेष्ठ शिवसैनिक सर्जेराव आबा भोसले व इतर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महाराष्ट्र मज़दूर संघटनेचे पदाधिकारी आयकॉन हाँस्पीटल चे सर्व डॉक्टर सर्व कर्मचारी वर्ग, तसेच युवक ही मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
या शिबिरांतर्गत कामगारांच्या ह्रदयरोग, किडणी, हाडांचे व मनक्याचे आजार, कान, नाक घसा, नेत्ररोग, लहान मुलांचे आजार अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामध्ये सुमारे पाच हजार माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच येत्या १५ व १६ जून रोजीही मोफत सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इरफान सय्यद म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, कामगारांची नगरी म्हणून ओळख आहे. राज्याच्या कानाकोप-यातून नागरिक शहरात आपल्या उदरनिर्वाहासाठी येतात. मिळेन ते काम करतात. असंघटित, माथाडी कामगार कष्टाचे काम करतात. कामगार आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांच्याकडे अधिकचे पैसे नसतात. त्यामुळे कष्टकरी कामगार त्याकडे दुर्लक्ष करतात. उपचार घेत नाहीत. त्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, आजार बळावतो. त्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठीच महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने कष्टक-यांसाठी आणि त्यांच्या परिवाराकरिता सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबिराची सोय उपलब्ध केली आहे त्याचा लाभ घ्यावा”, आवाहनही इरफान सय्यद यांनी केले आहे.