- दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने तरुणाला कटरने बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी दि. १६ मे २०२६ :- रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून एका ४३ वर्षीय व्यक्तीला धारदार कटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दापोडी येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
याप्रकरणी रवी राजुलिंगम पिल्ले (वय ४३, रा. दापोडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रवी पिल्ले हे फुगेवाडीकडून मधल्या मार्गाने पवार वस्ती येथील आपल्या घराकडे पायी चालत जात होते. पवना नदी पुलाजवळ आले असता, पिल्ले हे दारूच्या नशेत असल्याने त्यांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
याचा राग आल्याने तिथे उपस्थित असलेला आरोपी गोविंद आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराने पिल्ले यांना गाठले. त्यांनी पिल्ले यांना आधी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील धारदार कटरसारख्या वस्तूने पिल्ले यांच्या डाव्या कानावर, डाव्या जबड्याखाली, मानेवर आणि डाव्या पायाच्या मांडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात पिल्ले गंभीर जखमी झाले.
हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी जवळच पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये वाट पाहत थांबलेला त्यांचा तिसरा साथीदार ऋषिकेश घोरपडे याच्या गाडीत बसले आणि तिघेही घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना १३ मे रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील कब्रस्तानच्या विरुद्ध बाजूला, पवना नदी पुलाजवळ घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून कारचालक आरोपी ऋषिकेश घोरपडे याला अटक केली आहे. उर्वरित दोन मुख्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जासूद करत आहेत.













