न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड आयुक्तलयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या औद्योगिक पट्यातील गुन्हेगारी उखडून फेकण्यासाठी ‘इंडस्ट्रीयल रिलेशन सेल’ ची स्थापना करण्यात आली आहे. सहायक आयुक्त या सेलच्या प्रमुखपदी असणार आहेत.
तसेच थेट आयुक्तांच्या निगराणीखाली या सेलचे कामकाज चालणार आहे. गुरुवारी (दि. १३) रोजी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या सेलची घोषणा केली. पिंपरी चिंचवड आयुक्तालायाच्या अखत्यारीत येणा-या पिंपरी, भोसरी, तळेगाव आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे परदेशी कंपन्या दहशतीखाली आल्याचे चित्र आहे.
त्याकरीता आयुक्त पद्मनाभन यांनी ‘इंडस्ट्रीयल रिलेशन सेल’ ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. औद्योगिक पट्ट्यातील कंपनी व्यवस्थापन, कामगार आणि अन्य उद्योजकांना कोणत्या स्वरूपाचा त्रास झाल्यास ‘इंडस्ट्रीयल रिलेशन सेल’ त्यासाठी काम करणार आहे. शहरात सध्या कार्यरत असलेल्या खंडणी, दरोडा प्रतिबंधक विभागाकडे ‘इंडस्ट्रीयल रिलेशन सेलची’ जबाबदारी सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.















