न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पुण्यातील वुमेन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे पिंपरी-चिंचवड शहर, परिसर आणि ग्रामीण भागातील युवती आणि महिलांसाठी, येत्या सोमवारी (दि. १७) रोजी चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात दुपारी तीन वाजता ‘महिला उद्योजकता विकास’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर विनामूल्य असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे उद्योग स्थापन करणा-या इच्छुक युवती व महिलांसाठी उद्योग आधार नोंदणी विनामूल्य करून देण्यात येणार आहे. या उद्योजकता विकास शिबिरामध्ये प्रशिक्षणापासून तर सरकारचे नवीन औद्योगिक धोरण, महिलांविषयी उद्योग धोरण, सरकारच्या विविध योजना, अन्न व औषध विभाग, मुद्रा लोन ,पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग आधार नोंदणी, शॉप अॅक्ट परवाना याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
महिला उद्योजकता विकास शिबिरात जास्तीत-जास्त युवती व महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महिला विकास फाउंडेशनचे संचालिका माजी नगरसेविका सुलभा उबाळे, संस्थेच्या संचालिका अपर्णा देशपांडे, पियुषा पवार, श्रद्धा मोरे, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर कुवर यांनी केले आहे.















