न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पालिकेने सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विशेषतः पिण्याचे पाणी, पालखीतळावर निवास, शौचालयाची सुविधा चांगल्या प्रकाराची ठेवावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या आहेत.
पालखीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात असतो. त्या, पार्श्वभूमीवर मागील वर्षी पालखी तळावर वारक-यांसाठी शौचालयची सुविधा अपुरी असल्याचे दिसून आले. निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्प चौकामध्ये उडाणपुलाचे तसेच केबल टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या चौकामध्ये रस्ते अरुंद झाले आहे. मोरवाडीतील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुतळा चौक, पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते कासारवाडीच्या नाशिक फाटा चौकापर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे आधीच अरुंद रस्ता अजून अरुंद झाला आहे.
पालखी सोहळ्यात लाखो वारकरी शेकडो दिंड्यांसह पालखी रथाच्या पुढे मागे चालत असतात. त्यात त्यांच्या साहित्यांचे ट्रक, टेम्पो, पोलिस बंदोबस्ताची वाहने, रुग्णवाहिका आदींचा समावेश असल्यामुळे अरुंद रस्त्यामुळे वारक-यांची व भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या पालखी सोहळ्यातील वारक-यांना व पालखीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.















