- इंद्रायणीच्या पुरामुळे वास्तव समोर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगाव (दि. ७ जुलै २०२६) :- सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका देहुगाव पंचक्रोशीतील येलवाडी परिसराला बसला आहे. नदीपात्र आणि पूररेषेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या काही अनधिकृत बांधकामांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने या बांधकामांची दयनीय अवस्था झाली आहे. परिसरातील अनेक संरचना पाण्याखाली गेल्याचे चित्र समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, नदीपात्रालगत अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्याबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित यंत्रणांनी वेळीच कठोर कारवाई न केल्याने आज पुराचा फटका थेट या बांधकामांना बसला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून पूररेषेतील अतिक्रमणे हटवावीत, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बांधकामांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

















