- नैसर्गिक नाले बुजविणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाईची मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ७ जुलै २०२६) :- प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकासनगर, गुरुद्वारा परिसर आणि वाल्हेकरवाडी येथे मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग व सोसायट्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला व महानगरपालिका प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान काही ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवून झालेल्या बांधकामांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित बिल्डरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, बांधकाम परवाने रद्द करावेत तसेच नुकसानग्रस्त सोसायट्यांना बिल्डरांकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

















