न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- मोशी-चिखली रोडवर गंधर्व एक्सलन्स सोसायटी आहे. या रहिवासी सोसायटीच्या इमारतीमध्ये बाराव्या मजल्यावर १२०२ या बंद फ्लॅटला अचानक आग लागली. ही घटना आज सोमवारी (दि. १७) रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली.
या फ्लॅटचे मालक स्वप्नील सुनील डुबेरकर आहेत. डुबेरकर दाम्पत्य आज सकाळी नोकरीनिमित्त बाहेर गेले. फ्लॅटमधून धूर येत असल्याचे पाहून सोसायटी मधील सतर्क नागरिकांनी फ्लॅटचे लॉक तोडून इमारतीमध्ये लावलेली अग्निशमन यंत्रणा सुरू केली. यामुळे आग किचन पर्यंत आली नाही.
अग्निशमन विभागाला घटनेची महिती मिळताच चिखली अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी किचनमधून एक गॅस सिलेंडर आणि ड्राय बाल्कनीमधून एक असे दोन सिलेंडर बाहेर काढले. सिलेंडरपर्यंत आग न पोहोचल्यामुळे इमारतीमध्ये होणारा संभाव्य धोका टळला.
आगीत फ्लॅटमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, धान्य, इलेक्ट्रिकल वायरिंग बोर्ड जळून खाक झाले. तसेच आगीच्या उष्णतेमुळे फ्लॅटचे पीओपी कोटिंग आणि काँक्रीटला तडे गेल्यामुळे मोठे नुकसान झाले, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.















