न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- भाजपा सरकार लोकशाहीची गळचेपी करीत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सोमवारी (दि. १७) केला. मतदारासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आकुर्डी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर भारिप बहुजन महसंघाच्या वतीने ईव्हीएमच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. तहसीलदार गीता गायकवाड यांना भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ‘ईव्हीएम’ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली. ईव्हीएम मशीन मॅनेज करून भाजप निवडणूका जिंकत आहे. निवडणूक आयोग भाजप सरकारच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करण्यात आला.















