न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- नवीन शैक्षणिक वर्षाचा शाळेचा आज पहिला दिवस; दोन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज विद्यार्थांनी शाळेत पाऊल ठेवले. तर काही नवीन बालके आज प्रथमच शाळेत दाखल झाली. कोणाच्या चेहऱ्यावर कुतूहल, रडके भाव, भेदरलेली स्थिती, तर कुठे नव्या वातावरणाचा आनंद, नवीन शाळेविषयी ओढ अशा वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस पार पडला.
विद्यार्थाच्या मनामध्ये शाळेविषयी ओढ व उत्साह निर्माण करण्यासाठी आज कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, तापकीरनगर, काळेवाडी या शाळेच्या वतीने “नवागतांचे स्वागत” व पुस्तक वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. तोरणे- फुलांच्या माळा लावून शाळा सजविण्यात आली. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या गजरात नवागत विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेतील उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून शाळेत रोज येण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर खाऊ वाटप करून नियमित शाळा सुरु करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी केले तर, कार्यक्रमाचे सूत्र संचालन गुमे मॅडम यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.















