- शॉक लागून तीन जनावरांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ, (दि. २४ जुलै २०२६) :- मावळ तालुक्यातील औंढे गावात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्घटनेत तीन जनावरांचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास महावितरणची ओव्हरहेड वीजवाहिनी तुटून थेट जमिनीवर कोसळली. त्या वेळी परिसरात चरत असलेली जनावरे वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
या दुर्घटनेत शेतकरी नारायण लक्ष्मण मांडेकर यांच्या मालकीची एक दुभती गाय, एक वासरू आणि एक रेडा जागीच दगावले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित भागातील वीजपुरवठा बंद करून धोकादायक वीजवाहिनी हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. सध्या महसूल आणि संबंधित विभागाकडून पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, तुटलेल्या वीजवाहिनीमुळे निष्पाप जनावरांचा बळी गेल्याने महावितरणच्या देखभाल आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाधित शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

















