न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगाव (दि. १९ जून २०१९) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची आषाढी बुधवारी (दि. २६) पिंपरी चिंचवड शहरातून मार्गस्थ होणार आहे. वारीतील दिंडीप्रमुखांना दरवर्षी भेटवस्तू देऊन स्वागत केले जाते. मात्र, यंदा भेटवस्तू द्यायची किंवा नाही त्यावरून ‘श्रीमंत’ समजल्या जाणा-या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पदाधिका-यांमध्ये एकमत होत नाही.
त्यामुळे यंदा पुन्हा भेटवस्तूवरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही वारीतील सुमारे ७५० मोठ्या दिंडीप्रमुखांना पालिकेतर्फे भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते. ही पालिकेची जुनी परंपरा आहे. मात्र, उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पालिकेने सण, उत्सव, स्वागत आदींवर खर्च. न करण्याचे सक्त निर्बंध आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपासून पालिकेने भेटवस्तू वाटप आणि स्वागत आयुक्तांनी भेटवस्तू खरेदी करता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून पालिका स्वागत कक्षाऐवजी मदत केंद्र उभे करते. तर पालिकेच्या नगरसेवकांनी आपल्या मानधनातून गेल्या वर्षी ताडपत्री वाटप केले. देहू व आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी भेटवस्तृऐवजी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पाल्यास आर्थिक मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
पालिकेतर्फे आषाढी वारी सोहळ्यातील सर्व वारक-यांना मुक्कामाच्या ठिकाणी आकुर्डीत तसेच, पालखी मार्गावर निवास, पिण्याचे पाणी, वीज, शौचालय आदी सर्व सोईसुविधा पुरविल्या जाणार आहेत. यंदा त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याबाबत सर्व पदाधिकारी व गटप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले.
दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याची पालिकेची परंपरा अखंडीत राहावी, अशी शहरवासीयांची इच्छा आहे. सत्ताधारी भाजप भेटवस्तू देण्यास उत्सुक दिसत नाही. त्यांना भेटवस्तू देण्याची इच्छा नसल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आपल्या मानधनातून दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देतील. मात्र, पालिकेची परंपरा खंडित होऊ देणार नाही.
– दत्ता साने (विरोधी पक्षनेते, पिं. चिं. मनपा.)













