न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बस मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर चाप बसवण्यास सुरवात केली आहे. गेल्या सव्वा महिन्यात विविध भागातील ५५ अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. याचा थेट फायदा पीएमपीच्या महसूलात होत असून, रोजचा महसूल एक लाखांनी वाढला असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात ३१ लाखांचा महसूल होता तो ३२ लाखांपेक्षा अधिक झाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून मिळाली आहे. शहरात पीएमपीच्या मार्गावर इतर वाहनांची संख्या वाढती होती. या वाहनाकडून अनेकदा बस थांब्यावरील प्रवासी नेण्यात येतात त्यामुळे पीएमपीचा तोटा होत होता. वाहकांना त्याबाबत विचारण्या केल्यानंतर अवैध वाहनांचे प्रमाण आणि मार्गावरील खासगी वाहनांतून होणारी वाहतूक वाढत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार बस मार्गावरील या वाहनांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. सहा मे पासून हे पथक कार्यरत झाले आहे. शहरात प्रथम टप्यात सहाआसनी रिक्षा, तीन आसनी रिक्षा यावर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यापुढील तपासणीत मोटारी, जीप, टैम्पो, ट्रव्हलर आणि कंपन्यांच्या खासगी बसेसही वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण ५५ वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.













