- सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणे हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य – रवींद्र चव्हाण, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष..
- तंत्रज्ञानयुक्त आणि संवादाचा मेळ साधणाऱ्या जनकल्याण शिबिरांतर्गत आयोजित लाभार्थी शिबिरासाठी रविंद्र चव्हाण यांनी केले राहुल कलाटे यांचे अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- सरकार योजना तयार करते; मात्र त्या योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांची अंमलबजावणी करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. योजनेचा केवळ प्रचार न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच लोकप्रतिनिधींची खरी ताकद आहे, असे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत वाकड येथे भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
राहुल कलाटे यांच्या माध्यमातून आतापर्यंत ६४ जनकल्याण शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, साडेआठ हजारांहून अधिक नागरिकांना विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी आमदार शंकरशेठ जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रशांत शितोळे, बाळासाहेब काशीद यांच्यासह पदाधिकारी, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.


















