- खातेनिहाय विभागीय चौकशीचा मार्ग मोकळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्याविरोधात आता खातेनिहाय विभागीय चौकशीचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत ८ जुलै रोजी अचानक कोसळली होती. या दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी पर्यावरण विभागातील कुलकर्णी, कार्यकारी अभियंता आल्हाट आणि अग्निशमन अधिकारी चिपाडे यांना निलंबित केले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जुलै रोजी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. विभागीय आयुक्त शीतल उगले-तेली यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, मुंबई आयआयटीचे प्रा. डी. एन. सिंग तसेच पर्यावरण व घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील अनिलकुमार दीक्षित यांचा समावेश होता.
महापालिकेच्या अंतर्गत चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कर्तव्यात गंभीर स्वरूपाची निष्काळजी, शासकीय कामकाजातील हलगर्जीपणा, अधिकारांचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणे आणि पर्यावरणीय नियमांचे पालन न करणे, अशा स्वरूपाचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने तिन्ही अधिकाऱ्यांना दोषारोपपत्र बजावून त्यांच्याकडून खुलासे मागविले होते. मात्र, त्यांचे खुलासे समाधानकारक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विभागीय चौकशीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या चौकशीला किमान सहा महिने लागू शकतात. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सेवेतून बडतर्फी अथवा अन्य नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.


















