न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- नाशिक-पुणे महामार्गावरील भारतमाता चौक, मोशी येथे भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला धडक दिल्याची घटना सोमवारी (२८ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कंटेनर चालक जीशान अनवर खान (वय ३३, सध्या रा. मोशी, मूळ रा. झारखंड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. ती व्यक्ती भारतमाता चौकातून नाशिक-पुणे महामार्ग ओलांडत असताना भोसरीकडून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने तिला धडक दिली.
कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. धडकेनंतर व्यक्ती कंटेनरखाली आल्याने त्यांच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मच्छीद्र लक्ष्मण कोकतरे यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे व पोलीस उपनिरीक्षक खडसे करीत आहेत.


















