न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- काळेवाडी येथे शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष गोपीचंद बंदपट्टे (वय ४३, रा.काळेवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार दिनेश अदिनाथ शेंडे (वय ४०, रा. रहाटणी) आणि ३३ वर्षीय महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या मित्रांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे सांगून गुंतवणुकीच्या रकमेवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व इतरांकडून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने एकूण १ कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये स्वीकारण्यात आले. मात्र, गुंतवणुकीवरील परतावा तसेच मूळ रक्कम परत न करता आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही घटना १ जून २०२० पासून २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत काळेवाडीतील नढेनगर परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.


















