न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा टपऱ्यांवर सुरुवातीपासूनच नजर ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने बीट निरीक्षकांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या विशिष्ट भागात दीर्घकाळ एकाच अधिकाऱ्याची नियुक्ती राहू नये, यासाठी बीट निरीक्षकांची दर तीन महिन्यांनी बदली करण्याची सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे.
महापालिकेच्या हद्दीत नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामाची माहिती सर्वप्रथम बीट निरीक्षकांच्या पातळीवर मिळते. बांधकाम सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे आणि पुढील कारवाईसाठी पाठपुरावा करणे, अशी त्यांची जबाबदारी आहे. मात्र, काही भागांत अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत.
एकाच परिसरात दीर्घकाळ कार्यरत असताना स्थानिक बांधकाम व्यावसायिक किंवा इतर संबंधितांशी बीट निरीक्षकांचे आर्थिक हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अनधिकृत बांधकामांवर वेळेत कारवाई न झाल्याने शहरातील बेकायदा बांधकामांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळते. ही शक्यता टाळण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्तीचा कालावधी मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या कार्यपद्धतीनुसार तीन महिन्यांनंतर बीट निरीक्षकांना दुसऱ्या भागात नियुक्त केले जाणार आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट परिसरातील स्थानिक घटकांशी दीर्घकाळ संबंध निर्माण होण्याला मर्यादा येईल आणि अनधिकृत बांधकामांवर अधिक निष्पक्षपणे देखरेख ठेवण्यास मदत होईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
दरम्यान, केवळ बदल्या करून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटणार नसल्याचेही स्पष्ट आहे. बीट निरीक्षकांकडून मिळणाऱ्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करणे आणि बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच कारवाई करणे आवश्यक ठरणार आहे.
“एखाद्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम किंवा टपरी उभी राहत असल्यास सुरुवातीलाच त्यावर कारवाई करण्याच्या सूचना बीट निरीक्षकांना आहेत. मात्र, अनेक निरीक्षक त्याप्रमाणे कार्यवाही करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बीट निरीक्षकांच्या दर तीन महिन्यांनी बदल्या करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.”
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त मनपा..


















