- १,५०० हून अधिक सफाई सेवकांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याची नियमित तपासणी तसेच सुरक्षित कामकाजाबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले.
थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे झालेल्या या शिबिरात ‘अ’, ‘ब’, ‘ड’ ‘ग’ आणि ‘ज’ या पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत १,५०० हून अधिक सफाई सेवकांनी सहभाग घेतला होता,या शिबिराचे उद्घाटन ग क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांनी केले.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, सुधीर वाघमारे, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, राजू साबळे, शांताराम माने, डॉ. संजय सोनेकर, डॉ. शंकर मोसलगी, आदी उपस्थित होते.


















