- ‘विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’; कामगार नेते अनुप मोरे यांचा शब्द’..
- चिंचवडमध्ये भव्य माथाडी पदाधिकारी मेळावा संपन्न; हजारो पदाधिकाऱ्यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- भांडवलशाहीच्या व्यवस्थेत कामगार हा कंपनीचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कंपनी किंवा संस्थेकडून कामगारांवर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कामगारांच्या हिताचा अजेंडा राबविताना त्यांच्या कुटुंबांना आनंद मिळावा, तसेच शिक्षण, आरोग्य आणि विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काम केले पाहिजे. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारसोबत संवाद साधून कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा. भाजप कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियन (रजि.) यांच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवार (दि. 29) रोजी राज्यस्तरीय माथाडी पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी महापौर रवि लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, अध्यक्ष विजय हरगुडे, जयदीप खापरे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, अक्षय वरघडे, राकेश सणस, वसीम शेखआदी पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

चव्हाण म्हणाले की, शिखर संघटना सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असेल, तर ती कौतुकास्पद बाब आहे. कामगारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविताना त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाचाही विचार केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांच्या माध्यमातून २५ कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दारिद्र्य रेषेखालून बाहेर काढण्यात आले आहे. पुर्वी कामगार कायद्यांमुळे कामगारांना अडचणी येत होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यात आवश्यक सुधारणा करून कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या कल्याणासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करताना संघटना अडचणीत येणार नाहीत, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनांनी सरकारसोबत चर्चा करून कायदेशीर पद्धतीने मागण्यांची पुर्तता करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युनियनचे संस्थापक तथा कामगार नेते अनुप मोरे म्हणाले की, ही संघटना पक्षाने जन्माला घातलेले बाळ आहे. २०१४ मध्ये माथाडी युनियन सुरू केली असून, राज्यभरातून आतापर्यंत १५ हजार सदस्य जोडले आहेत. २०२९ पर्यंत ५० हजार सदस्य जोडण्याचे लक्ष्य आहे. २०२९ मध्ये राज्यात आणि देशात सत्ता आणण्यासाठी संघटनेचा सिंहाचा वाटा असेल, असा शब्द देत “तुम्ही आमच्या पाठीशी राहा. आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमच्यामुळेच मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली असून, या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी संतोष कांबळे यांनी आभार मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.


















