न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक आज बुधवार (दि. १९) रोजी सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, पर्यटक यांचेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शहरामध्ये महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याकामी मंजुरी देण्यात आली.
आदित्य बिर्ला गुपचे डायरेक्टर श्रीम. राजश्री बिर्ला यांनी महानगरपालिकेच्या ताब्यातील (किमान ०२ एकर जागा) पिंपरी येथील स. नं. २६ /१, /२, २७/ १४ /, २८ / १अ, ब, / २, ३० /१/२ पै. सि. स. नं. ४६९४ पै. मधील मंजूर बांधकाम रेखांकनातील सुविधा भुखंड व आरक्षण क्र. १२४ ( MSEB SUB STATION ) करीता आरक्षित असलेले क्षेत्र ६८०६. ५८ चौ. मी. उपलब्ध करून दिल्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने संपूर्ण बांधकाम खर्च व देखभाल दुरुस्ती केली जाईल, असे पत्र महापालिकेस दिले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने सभेत निर्णय घेण्यात आला.
बिर्ला प्रशासनाकडून स्मारक उभारणीनंतर जागेचा व स्मारकाचा ताबा महापालिकडे राहील. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ७९ (क) नुसार या प्रकल्पास स्थायीने मान्यता दिली आहे.













