न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी विविध मार्गाचा अंवलब केला जात आहे. कर संकलन विभाग व बांधकाम परवानगी विभागाच्या अधिका-यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उत्पन्न वाढीबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी मिळकतींचे सर्वेक्षण करण्यास आयुक्तांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मिळकतकराची तब्बल २३२ कोटी रुपये थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी १३ जुलैला शहरात लोकअदालत आयोजित केली आहे. लोकआदालतीमध्ये एकरकमी थकीत मिळकतकर भरल्यास ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे. त्यास आयुक्तांसमवेत झालेल्या जिल्हा न्यायाधीश यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. तसेच, लोकअदालतीमध्ये संपूर्ण थकबाकी भरल्यास ग्राहकांना थकबाकी रकमेवर १० टक्के सलवत देण्यात येणार आहे.
थकबाकीवरील १० टक्के रक्कम ही दंडाच्या रकमेपेक्षा जास्त असल्यास केवळ दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. तसेच, स्थानिक संस्था कर (एलबीटी), आकाशचिन्ह व परवाना आदी विभागांकडील थकीत प्रकरणे असल्यास लोक अदालतीमध्ये त्यांना व्याजाच्या रकमेवर आणि १० टक्केपर्यंत सूट देण्यात येणार आहे. त्यास स्थायी समितीने ऐनवेळी मंजुरी देऊन पालिका सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.













