न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- नैसर्गिक मृत्यू झालेल्या किंवा ६० वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीसाठी स्मशान दाखला (पास) देण्याची शिफारस पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक करतात. या संदर्भात राज्य शासन तसेच, पालिकेचा कोणताही नियम नाही. रूढी व पूर्व परंपरेनुसार ही शिफारस केली जात होती. कायदेशीर बाब उद्भवू नये म्हणून ही पद्धत बंद करून मान्यताप्राप्त ३ डॉक्टरांचा सेल स्थापन करून, त्यांच्याकडून पोस्टमार्टम अहवाल घेऊन स्मशान पास द्यावा, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरात वैद्यकीय इलाज न करता नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्यास किंवा भविष्यात ६० वषपिक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाल्यास त्यांना स्थानिक नगरसेवकांकडून स्मशान पास देण्याबाबत शिफारस करतात. वॉडतील असल्याने नगरसेवक व त्यांचे स्वीय सहायक तातडीने सदर शिफारस पत्र देतात. त्यामुळे स्मशान पास मिळवुन पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यविधी उरकला जातो. मात्र, अशा प्रकारे वैद्यकीय अहवालाविना अंत्यसंस्कार केल्याने भविष्यात कायदेशीर बाबी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिफारस पत्र देणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होण्याचा धोका असतो. ही पद्धत पालिकेत गेल्या २५ वर्षापासून सुरू आहे. त्यासंदर्भात महापालिका अधिका-यांकडे मडिगेरी यांनी स्थायी समिती सभेत विचारणा केली. रूढी व पूर्व परंपरानुसार नगरसेवक शिफारस पत्र देतात, असे उत्तर अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सावळे यांनी दिले.
राज्य व पालिकेचा कोणताही नियम नसताना नगरसेवकांकडून शिफारस पत्र देण्यावर मडिगेरी यांनी आक्षेप नोंदविला. ही पद्धत चुकीची असून, स्मशान पास देण्यापूर्वी मयताचे मृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणपत्र फॉर्म ४ व ४ अ या नमुन्यामध्ये अथवा डॉक्टरांच्या पोस्टमार्टमचा अहवाल घेऊन स्मशान पास दिला जावा, असे निर्देश मडिगेरी यांनी प्रशासनाला दिले. मात्र, या पध्दतीमुळे अंत्यविधीस उशिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नागरिक हा निर्णय कशा प्रकारे पचवतात हे आगामी काळच ठरवेल.













