न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- प्राधिकरण येथील हेडगेवार भवनच्या शेजारील मोकळ्या भूखंडाचा चक्क महापालिकेकडूनच अनधिकृतरित्या वापर होत आहे. २०१३ सालापासून या परिसरातील नागरिक या जागेच्या अनधिकृत वापराविरोधात लढा देत आहेत. हा लढा तीव्र करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
सध्या या जागेवर कच-याच्या गाड्या, शौचालयाच्या फिरत्या गाड्यांचे पार्किग मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या गाड्या स्वच्छ धुतल्या न गेल्यामुळे परिसरात नागरिकांना दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हा प्रश्न आणखीनच बिकट होतो. त्याचबरोबर या मोकळ्या जागेवर लोखंड, भंगार, टायर अशा वस्तूंचा साठा ठेवण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये पाणी साचून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या भयंकर आजारांचा नागरिकांना सामना करावा लागतो.
या जागेवर पूर्वी आरटीओ आणि अवजड वाहनांचे पार्किंग करण्याचा घाट घालण्यात आला होता. नागरिकांनी याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आरटीओला फटकारले होते. ज्या हेतूसाठी म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती केंद्रासाठी या जागेचा वापर होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच वापर करण्याचे निर्देश दिले. मात्र, या आदेशाचा महापालिकेलाही विसर पडला आहे. या परिसरातील अस्वच्छता व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्याही निदर्शनास आणून देण्यात आले असून, मंडळानेही याची दखल घेत प्रदूषण मानकांचे काटेकोरपणे पालन करण्याचे व नागरिकांच्या दृष्टीने घातक ठरेल, असा कोणताही वापर त्वरित बंद करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा ते सध्याचे श्रावण हर्डीकर यांच्यापर्यंत सर्वच आयुक्तांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, आजतागायत यावर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही.
नागरिकांनी हेगडेवार भवनच्या शेजारील मोकळ्या भूखंडाचा महापालिकेकडूनच अनधिकृतरित्या वापर होत असल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक वृक्षारोपण करून त्यावर आपल्या मागण्यांचे फलक लावले. या वेळी माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, राज्य माथाडी कामगार मंडळाचे अनूप मोरे, स्थानिक नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरमचे ज्येष्ठ सदस्य सुशिल साहनी, चंद्रकांत कोठारी, सुशिल मुथियान, मनोज कुसाळकर आदींसह परिसरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.















