- सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ सप्टेंबर २०२६) :- चिंचवड येथील रुनवाल गेटसमोरील अंतर्गत रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करताना मनाई आदेशाचे उल्लंघन करून उच्च क्षमतेचा डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी तिघांवर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संकल्प प्रकाश तेलंगी (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी), मॅनेजर विक्रांत पवार (रा. पुनावळे) आणि सुपरवायझर योगेश शिंदे (वय ४५, रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुनवाल गेटसमोरील अंतर्गत रस्ता, आनंदनगर, चिंचवड येथे आरोपी उच्च क्षमतेचा डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम व ध्वनी प्रदूषण करणारी साधने वापरत असल्याचे आढळून आले. या साऊंड सिस्टीमची किंमत सुमारे ३ लाख ८० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या १४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार १६ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही आरोपींनी डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई प्रितम विलास फरांदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ३९ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेरखाने आणि महिला पोलीस उपनिरीक्षक डोंगरे करीत आहेत.


















