न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या मर्सिडीज कारवर अखेर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. साई चौक परिसरात उभ्या असलेल्या गोल्डन रंगाच्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.
पोलिसांच्या तपासणीत वाहनाच्या काचांवर काळी फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट आणि वाहनाच्या रंगात बदल केल्याचे आढळले. याशिवाय वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याचे तसेच विम्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.
या विविध नियमभंगांप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कारवरील काळी फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेट काढून घेतली. संबंधित वाहनमालकाला एकूण ६ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
या कारवाईमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या ‘गोल्डन गाईज’च्या वाहनांवरील पोलिसांची नजर पुन्हा चर्चेत आली आहे. यापूर्वी संजय गुजर यांच्या वाहनावरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. दरम्यान, वाहनांचे मॉडिफिकेशन करताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमबाह्य बदल आणि सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार आहे.


















