- पावसामुळे खराब झालेल्या मार्गांची दुरुस्ती; काही लेन तात्पुरत्या बंद…
- वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- बंगळुरू-मुंबई महामार्गावरील रावेत आणि ताथवडे परिसरातील भुयारी मार्गांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे आणि खराब झालेल्या मार्गांची अवस्था लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काँक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे.
पवना नदीपासून रावेत अंडरपासपर्यंतच्या सेवा रस्त्यावरील मुंबईकडे जाणारी लेन कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ताथवडे अंडरपासखालील मार्ग आणि जेएसपीएम महाविद्यालयासमोरील सातारा लेनही काँक्रीटीकरणासाठी तात्पुरती बंद राहणार आहे.
यंदाच्या पावसामुळे किवळे ते वाकड दरम्यानच्या सेवा रस्त्यांसह भुयारी मार्गांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. काही ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. कामाच्या कालावधीत वाहतुकीचा वेग कमी होण्याची किंवा काही ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच घटनास्थळी लावण्यात आलेल्या वाहतूक आणि सूचना फलकांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित मार्ग अधिक मजबूत आणि टिकाऊ होण्याची अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.


















