- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार कोअर कमिटीची बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारात गेल्या काही महिन्यांत समोर आलेले मतभेद आणि सभांच्या कामकाजातील गोंधळ याची पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे कामकाज, उपसूचना, स्वीकृत सदस्य निवड, सभांचे थेट प्रक्षेपण तसेच मोशीतील कचरा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर सत्ताधारी गटातील नेत्यांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत समन्वयाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
महापालिकेत भाजपला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली असून ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच सभागृहातील कामकाज आणि स्थानिक नेतृत्वातील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित झाले.
नव्या कोअर कमिटीच्या माध्यमातून महापालिका आणि संघटनात्मक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय अधिक समन्वयाने घेण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. विकासकामांना प्राधान्य, महापालिकेतील धोरणे आणि संघटनात्मक कार्यक्रम याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, नगरसेवकांसाठी पक्षाच्या विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि महापालिका कारभाराबाबत निवासी प्रशिक्षणही आयोजित करण्यात येणार आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिकेतील सद्यस्थिती, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा आणि आगामी उपक्रमांबाबत चर्चा केली जाईल. स्थानिक पातळीवरील कामकाजात अधिक समन्वय साधण्यावरही बैठकीत भर राहणार आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप…महापालिकेतील पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये एकसंधपणा राहावा, यासाठी कोअर कमिटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. नगरसेवकांना पक्षाची भूमिका, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि महापालिकेचा कारभार याबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
– प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते…


















