- माजी डॉक्टरकडून अपमानाचा आरोप..
- अनुभव प्रमाणपत्रावरून झालेल्या वादातून प्रकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील माजी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरने केलेल्या तक्रारीवरून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नामदेव वाबळे यांच्याविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सेवेशी संबंधित काही बाबींवरून त्यांचा रुग्णालय प्रशासनासोबत पूर्वीपासून वाद सुरू होता. सेवेत रुजू होणे, गैरहजेरी, विभागीय चौकशी आणि सेवेतून कमी करण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी ते वायसीएम रुग्णालयात गेले होते. दुसऱ्या मजल्यावरील लिफ्टजवळ त्यांची डॉ. वाबळे यांच्याशी भेट झाली. अनुभव प्रमाणपत्रातील नोंदींबाबत चर्चा सुरू असताना जातिवाचक शब्दांचा वापर करून अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
घटनेच्या वेळी रुग्णालय परिसरात इतर व्यक्ती आणि रुग्ण उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त मनीषा कदम करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, तपासानंतर पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.


















