- १० मीटरचा रस्ता होणार १५ मीटर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चाकण परिसरातील पाच महत्त्वाच्या ठिकाणी रस्ते रुंदीकरण सुरू केले आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
खालुंब्रे, खालुंब्रे घाट, एचपी चौक, म्हाडा सोसायटी चौक आणि खराबवाडी या भागांत वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषतः चाकण औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहनांची संख्या वाढल्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होते.
सध्या काही ठिकाणी सुमारे १० मीटर असलेला रस्ता १५ मीटरपर्यंत रुंद करण्यात येणार आहे. यामुळे वाहनांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन वाहतुकीचा प्रवाह सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. महामार्गाची एकूण लांबी सुमारे ५४ किलोमीटर असून, त्यावरील खड्डे दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी रुंदीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे ५.१ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी आणि कामगार ये-जा करतात. वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालकांचा ३० ते ४५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ खर्च होत असल्याने रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, भविष्यात या मार्गावर चारपदरी उन्नत मार्गिकेचा प्रस्ताव असून, तो प्रत्यक्षात येईपर्यंत सध्याच्या रस्त्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.


















