- पिंपरी-चिंचवडच्या प्रिथिका प्रदीपची ऐतिहासिक कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड धनुर्विद्या संघाने चीनचा 238-234 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात पिंपरी-चिंचवडची कन्या प्रिथिका प्रदीप हिचा समावेश असून, तिच्या कामगिरीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी यांनी अंतिम सामन्यात अचूक निशाणेबाजी करत चीनवर वर्चस्व राखले. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा 234-233 असा पराभव केला होता.
भारतीय महिला कंपाऊंड संघाने एशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. प्रिथिकाचे हे पहिले एशियाई क्रीडा सुवर्णपदक आहे.
प्रिथिकाच्या यशामागे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मार्गदर्शन तसेच पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या सहसचिव तथा पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या सचिव सोनल बुंदेले यांनी तिच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.


















