- ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची करण्यात आली तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत आयोजित सफाई मित्र सुरक्षा शिबिरांमध्ये ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. २८ आणि ३० सप्टेंबर रोजी शहरातील दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात तसेच थेरगाव येथील स्व. शंकरराव गावडे कामगार भवन येथे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह आदींची मोफत तपासणी करण्यात आली. संतुलित आहार, व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणाव व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामाच्या स्वरूपानुसार सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते कचरा वेचकांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना, स्वयंरोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सफाई सेवक उपस्थित होते.

















