न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- एच.डी.एफ.सी. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून कार लोन फोरक्लोज करण्याच्या बहाण्याने महिलेची तब्बल २ लाख २२ हजार ४७४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जुनी सांगवी येथे समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी श्रुतीक सदानंद कासारे (रा. बदलापूर, ठाणे) याने फोनवरून आपण एच.डी.एफ.सी. बँकेच्या बंडगार्डन शाखेतील कर्मचारी असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या कारचे लोन फोरक्लोज करून देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने वेगवेगळ्या खात्यांवर वेळोवेळी एकूण २ लाख २२ हजार ४७४ रुपये घेतले. मात्र, कार लोन फोरक्लोज न करता घेतलेल्या रकमेचा अपहार केला. पैसे परत मिळावेत यासाठी फिर्यादीने आरोपीशी वारंवार संपर्क साधला; मात्र अद्याप कोणतीही रक्कम परत करण्यात आली नाही.
याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















