- पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थिती..
- पुरस्कार वितरणातून कलाकारांच्या कार्याचा केला गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- शहरातील कलाकारांनी कला, संस्कृती आणि सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी अधिकाधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शहरातील सांस्कृतिक चळवळीला सातत्याने बळ देण्यासाठी पुढील काळातही आवश्यक सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर कलाकार संघाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
आमदार जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड कलाकार संघाने गेल्या १९ वर्षांपासून शहरातील विविध क्षेत्रांतील कलाकारांना एकत्र आणण्याचे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत कलाकार संघाचे योगदान महत्त्वाचे आहे. कलाकारांना प्रोत्साहन मिळाल्यास शहरातील सांस्कृतिक क्षेत्र आणखी व्यापक होण्यास मदत होईल.
शहरातील स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलाविष्कारासाठी सातत्याने संधी मिळणे आवश्यक आहे. नाट्य, संगीत, नृत्य, चित्रकला तसेच अन्य कलाक्षेत्रांतील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
यावेळी कलाकार संघाच्या १९ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत आमदार जगताप यांनी संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच, आगामी काळातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. कलाकार संघाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.


















