न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- लोकशाही आणि संविधानाच्या सुरक्षेसह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ‘लोकशाही बचाव मार्च’ काढण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता आकुर्डी गावातील विठ्ठल मंदिर येथून या मार्चला सुरुवात होऊन तो तहसीलदार कार्यालय, निगडी येथे समाप्त होणार आहे.
मतदार याद्यांमधील बदल, पात्र मतदारांच्या नावांबाबत निर्माण होणारे प्रश्न तसेच विशेष पुनर्परीक्षण अभियान (SIR) यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण करण्यासह निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असावी, अशी भूमिका घेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी या मार्चद्वारे करण्यात येणार आहे.
या मार्चमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी, पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी तसेच लोकशाहीप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मार्चचा मार्ग : विठ्ठल मंदिर, आकुर्डी गाव ते तहसीलदार कार्यालय, निगडी
दिनांक : गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता


















