न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- बालाजीनगर, भोसरी येथील अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब कुटुंबांसाठी मंजूर असलेल्या ‘रमाई आवास योजने’च्या अंमलबजावणीवरून आता वाद निर्माण झाला आहे. शासनाची घरकुल योजना रद्द झाल्याचे सांगून आपल्याकडून संमतीपत्रांवर स्वाक्षऱ्या व अंगठे घेण्यात आले. त्यानंतर या स्वाक्षऱ्यांचा वापर करून खासगी बिल्डरच्या माध्यमातून अन्य प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप लाभार्थी नागरिकांनी केला आहे.
बालाजीनगरमधील काही लाभार्थ्यांनी याबाबत महापौरांकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित स्थानिक नेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना एकत्र बोलावून रमाई आवास योजनेतून मिळणारे अडीच लाख रुपयांचे अनुदान अपुरे असल्याचे सांगितले. तसेच ही योजना रद्द झाल्याची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या कथित दिशाभुलीमुळे नागरिकांनी काही छापील कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या व अंगठे केले. मात्र, त्यानंतर शासनाची योजना प्रत्यक्षात रद्द झालेली नसल्याचे समोर आल्याने लाभार्थ्यांनी या संमतीपत्रांवरच प्रश्न उपस्थित केला आहे. या स्वाक्षऱ्यांचा वापर करून खासगी बिल्डरमार्फत SRA प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांकडून घेण्यात आलेली संमती ही पूर्ण माहिती न देता व गैरसमज निर्माण करून घेतली असल्याने ती संमतीपत्रे मागे घेत असल्याचे लाभार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही खासगी प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रमाई आवास योजनेचा लाभ मूळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, संबंधित संमतीपत्रे व खासगी प्रकल्पाचा प्रस्ताव तपासणी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवावा आणि लाभार्थी, संबंधित स्थानिक नेते, सहकारी व बिल्डर यांची संयुक्त सुनावणी घेऊन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


















