न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता मालमत्ता नोंदणीच्या पातळीवरच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली आहे. शहरातील रेड झोन, बफर झोन, हरित पट्टा, नदीची निळी व लाल पूररेषा, आरक्षित जागा तसेच इतर प्रतिबंधित भागातील अनधिकृत बांधकामांची सर्व्हे क्रमांकासह माहिती मुद्रांक व नोंदणी विभागाला देण्यात येणार आहे.
या मालमत्तांमधील सदनिका व व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी होऊ नये, यासाठी महापालिकेकडून संबंधित विभागाशी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अनधिकृत मालमत्ता खरेदी करण्यापासून दूर राहावे, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करूनही पुन्हा बांधकामे उभी राहत असल्याने प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेलाच आळा घालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासही मदत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.


















