न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे जल व्यवस्थापन क्षेत्रातील परिषदेसाठी दक्षिण कोरिया दौऱ्यावर गेले आहेत. ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान सेऊल येथे त्यांचा दौरा असून, ‘डिजिटल वॉटर एक्सिलेटर प्रोग्राम’मध्ये ते सहभागी होत आहेत. जल व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे.
आयुक्तांच्या अनुपस्थितीत महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात राजकीय शिष्टाचार आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे कामकाज ते पाहणार आहेत.
मात्र, या कालावधीत त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


















