- संबंधित अधिकारी व बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ ऑक्टोबर २०२६) :-पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या शेजारी सुरू असलेल्या सुखवाणी असोसिएट्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स यांच्या खासगी प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याचे सांगून तब्बल ५२ जुन्या झाडांची वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून वृक्ष संवर्धन विभागातील संबंधित अधिकारी महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुद्धही फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘आप’च्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदन देऊन चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. झाडांची संख्या आणि वय कमी दाखवून संबंधित बिल्डर आणि महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी अहवालात फेरफार केल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. या प्रकारामुळे वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल करण्यात आली असून, वृक्षतोडीस प्रोत्साहन मिळाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वृक्षतोडीसंदर्भातील परवानगी आणि त्यासाठीची प्रक्रिया यांची सखोल चौकशी करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. संबंधित बांधकामाला वृक्षतोडीच्या नियमांचे उल्लंघन करून परवानगी देण्यात आली असल्यास ती तातडीने रद्द करून बांधकामाचे काम थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून १ हजार १८ झाडे लावण्यासाठी प्रति वृक्ष १५ हजार रुपये या प्रमाणे एक कोटी ५२ लाख ७० हजार रुपये भरून घ्यावेत आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांमध्ये वृक्षतोडीची परवानगी देताना कायदेशीर प्रक्रिया, सार्वजनिक सूचना आणि पर्यावरणीय बाबींचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आवश्यक प्रक्रिया आणि नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर विभागीय चौकशीसह लागू कायद्यांनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाचे पर्यावरणीय गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.

















